Jaiyvik Khatancha Vapar Pik Utpadan Vadhi Sathi पिकांचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी जमीन सुपीक आणि उत्पादक असणे आवश्यक असते. जमिनीची सुपीकता ...
Jaiyvik Khatancha Vapar Pik Utpadan Vadhi Sathi पिकांचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी जमीन सुपीक आणि उत्पादक असणे आवश्यक असते. जमिनीची सुपीकता फक्त जमिनीत असणारी अन्नद्रव्ये व रासायनिक घटकांवरचअवलंबून नसून जमिनीतील असंख्य विविध उपयुक्त सुक्ष्म जीवाणूंचा संख्येवर अवलंबून असल्याचे कृषि शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे सिध्द केले आहे.
जमिनीत निसर्गतः असणा-या सुक्षूम उपयुक्त जीवाणूंमध्ये कवक किंवा बुरशी (फंगस), अणुजीव (बॅक्टेरिया), शेवाळ(अल्गी), एक्टिनोमायसेटस यांचा समावेश होतो.
जैविक खतांचा वापर पीक उत्पादन वाढीसाठी
jaivik_khatancha_vapar |
उपयुक्त जीवाणूंचे खालील विविध प्रकारात वर्गीकरण करता येते
१.हवेतील मुक्त नत्र वायुचे स्थिरीकरण करुन जमिनीतील नत्राची उपलब्धता वाढविणारे जीवाणू.
२.जमिनीतील अ विद्राव्य स्फुरदाचे विघटन करुन त्याचे विद्राव्य स्फुरदामध्ये रुपांतर करणारे जीवाणू.
३.जमिनीतील पिकास उपलब्ध नसणारे पालाश पिकास उपलब्ध करुन देणारे जीवाणू,
४.पालापाचोळा व इतर सेंद्रिय पदाथीचे विघटन करुन त्यातील अन्नद्रव्ये पिकांस उपलब्ध करुन देणारे जीवाणू.
५.गंधक, मॉलिब्डेनम, जस्त, लोह, मँगनीज, बोरॉन,सिलिका इत्यादी सुष्म अन्नद्रव्यांचे रुपांतर पिकांना उपलब्ध स्वरुपात करणारे जीवाणू,
सर्वसाधारणपणे जमिनीचा उदासीन सामु असणा-या (६.५ ते ७.५) आणि पुरेशा सेंद्रिय कर्ब असणा-या (०.७ ते १.० टक्के) शेतजमिनींमध्ये वरील उपयुक्त जीवाणूंची संख्या चांगली असते आणि त्यामुळे त्यांचे संबंधित फायदे पिकास निसर्गतःच मिळू शकतात.
पीक उत्पादन वाढीच्या वरील अशास्त्रीय उपायामुळे परिणामी जमिनी क्षारयुक्त होऊन नापिक होत आहेत.अवाजवी रासायनिक खतांमुळे जीवाणूंचे खाद्य असलेल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीतील मातीच्या कणांची उपयुक्त सच्छिद्र अशी रचना बिघडून त्यांची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी होत आहे.दुसरीकडे रासायनिक खतांच्या किंमती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आर्थिक कुवतीबाहेर वाढल्याने खतांचा वापर कमी व परिणामी पिकांची उत्पादकता कमी अशा दुहेरी समस्येस शेतकरी तोंड देत आहे.
अशा परिस्थितीमध्ये जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवून पिकांचे अधिक उत्पादन मिळविण्याचे मृदा शास्त्रज्ञ यांनी विकसित केलेले सुधारीत तंत्रज्ञान म्हणजे पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. ज्यामध्ये खर्चिक रासायनिक खतांची मात्रा कमी करुन उत्पादन खर्च कमी होतो व उर्वरीत अन्नद्रव्यांची गरज सेंद्रिय खतांमधून भागविली जाते.
जैविक खत म्हणजे, उपयुक्त जीवाणूंची प्रयोगशाळेमध्ये कृत्रिम माध्यमावर वाढ करुन त्यांचे निर्जतुक केलेल्या लिग्राइट हया माध्यमात केलेले मिश्रण होय. या जैविक खतांचा उपयोग बियाणांवर अंतरक्षीकरण करुन, रोपांची मुळे जैविक खतांच्या द्रावणात बुडवून तसेच मातीमध्ये अगर कंपोस्ट खतामध्येमिसळून करता येतो. सध्या द्रव रुपातील जैविक खतेही उपलब्ध झाली आहेत.
जैविक खतामध्ये वापरण्यात आलेल्या जीवाणूंच्या प्रकारानुसार जैविक खतांचे चार प्रकार पडतात
१. नत्र स्थिर करणारे
२. स्फुरद विरघळविणारे
३. पालाश, गंधक व अन्य सुक्षूम अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारे
४. सेंद्रिय पदाथाचे विघटन करणारी जैविक खते
१. नत्र स्थिर करणारी जैविक खते
वातावरणामध्ये नत्र वायुरुप स्थितीत ७८ टक्के इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध असला तरी त्याचा उपयोग करुन घेण्यास वनस्पती असमर्थ आहेत. नत्र स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजीवाणू मात्र त्यांच्यामध्ये असणारे नायट्रोजिनेज या विकराच्या (एन्झाइमच्या) मदतीने हवेतील वायुरुप नत्राचे जमिनीत, अमोनिया ह्या वनस्पतींना उपलब्ध होणाऱ्या स्थितीत रुपांतर करतात. नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूंमध्ये रायझोबियम,अँझोटोबॅक्टर, बायजेरिंकिया, अँझोस्पिरीलम, निळे हिरवे शेवाळ व अझोला हया जीवाणूंचा समावेश होतो. हया जीवाणूंची त्यांच्या कार्यपध्दतीनुसार असहजीवी, सहजीवी व सहसहजीवी अशा तीन प्रकारात विभागणी होते.
असहजीवी पध्दतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू
अँझोटोबॅक्टर, बायजेरिकिया व निळे हिरवे शेवाळ हया जीवाणूंचा या प्रकारामध्ये समावेश होतो. अँझोटोबॅक्टर जीवाणू जमिनीत स्वतंत्रपणे राहतात. जमिनीत सेंद्रिय पदाथींच्या 'विघटनातून मिळणा-या उर्जेवर हे जीवाणू जगतात व स्वतंत्रपणे नत्र वायूचे अमोनियामध्ये रुपांतर करुन तो पिकांना उपलब्ध करुन देतात. शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल व तृणधान्य पिकांसाठी तसेच फळझाडे व फुलझाडांसाठी अँझोटोबॅक्टर जैविक खतांचा उपयोग होतो. नत्र स्थिरीकरणाबरोबरच हे जीवाणू जिब्रेलीक आमु, बी व्हिटॅमिन, इंडॉल अँसेटिक आमु, निकोटिनिक आमु, फोलिक आमु हया सारख्या वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणा-या पदाथीचीनिर्मिती करतात. त्याचा फायदा बियाणांची उगवण लवकर होण्यासाठी व उगवणीचे प्रमाण वाढविण्यासाठी, तसेच पिकांची वाढ जोमाने होण्यास होतो. अँझोटोबॅक्टर वापरामुळे गहु, ज्वारी, बाजरी, भात इ. बियाणांची उगवण क्षमता ३० ते ५० टक्क्यांनी जास्त झाल्याचे प्रयोगांती सिध्द झाले आहे. बायजेरिकिया हे अणुजीवाणू सामु ४.५ ते ६ असणाऱ्या जमिनीत नत्र स्थिरीकरण करतात.
निळे हिरवे शेवाळ हे एक असहजीवी प्रकारात मोडणारे महत्वाचे जैविक खत आहे. याच्या वाढीसाठी सतत पाण्याची गरज असल्याने निळया हिरव्या शेवाळाचा उपयोग प्रामुख्याने भात खाचरात व केळीच्या बागांमध्येच होऊ शकतो. निळे हिरवे शेवाळ एक हेक्टर क्षेत्रामध्ये प्रति वर्षी सुमारे ८० किलो नत्र स्थिर करते. भात खाचरामध्ये भाताच्या पुर्नलागणी च्या ८ ते १० दिवसांनी प्रति हेक्टरी २० किलो निळे हिरवे शेवाळ टाकल्याने २५ टक्के रासायनिक नत्र खताच्या बचतीबरोबरच भाताचे उत्पन्न ७ ते १० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे.
सहजीवी पध्दतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू
रायझोबियम जीवाणू जरी सहजीवी पध्दतीने जगत असलेतरी शेतामध्ये पीक नसताना हे जीवाणू जमिनीमध्ये सुप्तावस्थेत अस्तित्वात असतात. हेच जीवाणू शेंगवर्गीय द्विदल पिकांच्या मुळांमध्ये प्रवेश करुन मुळांवर गाठी तयार करतात. या गाठीमध्ये 'लेगहिमोगोबीन' या रंगद्रव्याच्या व 'नायट्रोजीनेज' या विकाराच्या मदतीने रायझोबियम जीवाणू हवेतील मुक्त नत्राचे 'अमोनियामध्ये' रुपांतर करुन तो पिकांना उपलब्ध करुन देतात. या बदल्यात हे जीवाणू त्यांना लागणारे अन्न व उब वनस्पतीकडून मिळवतात. अशा प्रकारे रायझोबियम जीवाणूंचे कार्य सहजीवी पध्दतीने चालते.
रायझोबियम जैविक खत वापरल्यामुळे रासायनिक नत्र खताच्या मात्रेत २५ टक्के बचत करुनही सरासरी उत्पन्नापेक्षा पिकाचे अधिक उत्पादन मिळाल्याचे व त्याचबरोबर शेंगवर्गीय बियातील प्रथिनाच्या प्रमाणात आणि तेलबियातील तेलाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे प्रयोगांती सिध्द झाले आहे. पीक काढणीनंतर मुळांवरील नत्र स्थिर करणाऱ्या गाठी जमिनीतच रहात असल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाणही वाढल्याचे व जमिनीच्या सुपिकतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
सहजीवी प्रकारात मोडणारे अझोला हे एक दुसरे जैविक खत असून ही नेचे वगातील पाणवनस्पती आहे. अझोला अतिशय थोडया अन्नावर उत्तम प्रकारे व झपाटयाने वाढतो. अझोलाच्या पेशीमध्ये अँनात्रा अझोली हे निळे हिरवे शेवाळ वगीतील शेवाळ वाढत असते. अझोलाच्या पानांमध्ये हरितद्रव्यअसल्याने अझोला स्वतःचे अन्न स्वतः तयार करते व शेवाळालाही पुरवते, तर शेवाळ हवेतील नत्र स्थिर करुन अझोलाला पुरविते. अशाप्रकारे अझोला व शेवाळ सहजीवी पध्दतीने जगतात, अझोलामध्ये ४ ते ५ टक्के इतका नत्र साठविला जातो.अझोल्याची वाढही झपाटयाने होत असल्याने अझोलाचा नत्र पुरविणारी वनस्पती म्हणून तसेच हिरवळीचे खत म्हणूनही चांगला उपयोग होतो. अझोला मध्ये पाणी व नत्राचे प्रमाण अधिक असल्यामुळे तो जमिनीत टाकल्यावर लवकर कुजतो व त्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते. अझोलाच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने अझोलाचा भात शेतीमध्ये चांगला उपयोग होतो.
भात खाचरात चिखलणीपुर्वी एक दिड महिना अगोदर पाणी साठवून त्यात अझोला टाकण्यात येतो. महिन्याभरात अझोलाची शेतावर पुर्ण वाढ होते. चिखलणीचे वेळी अझोला शेतामध्ये गाडण्यात येतो. तसेच भात लागणीनंतर एक आठवडयाने भात खाचरात प्रति मीटर वर्ग क्षेत्रासाठी ५०० ग्रॅम अझोला टाकतात. भात खाचरात अझोलाची पुर्ण वाढ झाल्यावर खाचरातील पाणी सोडून देण्यात येते व अझोला शेतामध्ये मिसळण्यात येतो. अशाप्रकारे हेक्टरी १० टन अझोला वापरल्यास भात पिकाला २५ ते ३० किलो नत्र प्रती हेक्टरी मिळते. अझोला वाढविण्यासाठी काही खर्च करावा लागत नाही फक्त सुरुवातीस मातृवाण म्हणून थोडा अझोला टाकावा लागतो इतकेच.
सहसहजीवी पध्दतीने नत्र स्थिर करणारे जीवाणू
ऍझोस्पायरिलम या जीवाणूंचा या प्रकारामध्ये समावेश होतो. हे जीवाणू सर्व एकदल वनस्पती, पालेभाज्या, फळभाज्या व फळझाडे यांच्या मुळांमध्ये तसेच मुळाभोवती मातीमध्ये राहून नत्र स्थिरीकरण करतात. हे जीवाणू ऍझोटोबॅक्टर पेक्षा अधिक कार्यक्षम असून ते ऍझोटोबॅक्टर पेक्षा दीडपट ते दुप्पट प्रमाणात अधिक नत्र पिकांना मिळवून देतात.
२.स्फुरद विरघळविणारी जैविक खते
आपल्या जमिनीमध्ये स्फुरदाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांच्या योग्य पोषणासाठी स्फुरदयुक्त खते वापरणे अपरिहार्य ठरते. वनस्पतींना स्फुरदाचा पुरवठा प्रेसमड केक, बेसिक स्लॅग इत्यादी सेंद्रिय खतांमधून तसेच सुपर फॉस्फेट हया रासायनिक खतांमधून केला जातो. परंतु जमिनीत टाकलेल्या स्फुरदाचा बराच भाग जमिनीच्या आम्ल विम्ल निर्देशांकानुसार निरनिराळया अविद्राव्य अशा रासायनिक पदाथीमध्ये रुपांतरीत होतो. अल्कधर्मीय कॅल्शियमयुक्त जमिनीत विद्राव्य स्फुरदाचे "ट्रायकॅल्शियम फॉस्फेट' या अविद्राव्य पदाथीमध्ये रुपांतर होते.तर आमूधर्मीय जमिनीत 'अँल्युमिनिअम फॉस्फेट' व 'आयर्न फॉस्फेट' या अविद्राव्य पदाथीमध्ये रुपांतर होते. या अविद्राव्य स्फुरदाचे वनस्पती शोषण करु शकत नाहीत. मात्र जमिनीतील काही अणुजीवाणू व बुरशी या अविद्राव्य स्फुरदाचे विद्राव्य स्वरुपात रुपांतर करतात व तो पिकांस उपलब्ध करुन देतात. हे कार्य करणा-या जीवाणूंना स्फुरद विरघळवणारे जीवाणू असे म्हणतात.
'बॅसिलस पॉलिमेग्झा' व 'सुडोमोनास स्ट्रायेटा' हे अणुजीवाणू आणि 'अँस्परजिलस अवामोरी' व 'पेनिसिलीयम डिजिटॅटम' या बुरशी अविद्राव्य स्फुरद विरघळविण्याचे कार्य कार्यक्षमने करतात. म्हणून या अणुजीवाणूंचा व बुरशींचा वापर स्फुरद विरघळविणारी जैविक खते बनविण्यासाठी केला जातो. स्फुरद व विरघळविणाऱ्या जीवाणुकडून नायट्रिक आम्ल , लॅक्टिक आम्ल , सक्सिनिक आम्ल , मॅलिक आम्ल , फ्युमॅरिक आम्ल , यासारखी विविध सेंद्रिय आम्ले स्रवली जातात. ही आमे अविद्राव्य स्फुरदाचे द्राव्य स्वरुपात रुपांतर करुन ते पिकास उपलब्ध करुन देतात. याशिवाय काही जीवाणू 'फॉस्फेटेज' नावाचे विकर स्रवतात व त्यामुळे अविद्राव्य स्फुरदाचे द्राव्य स्वरुपात रुपांतर होऊन तो वनस्पतींना उपलब्ध करुन दिला जातो.'रॉक फॉस्फेट' या नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या पदार्थामध्ये अविद्राव्य स्वरुपातील स्फुरदाचे प्रमाण २० ते ४० टक्के इतके असते. जमिनीमध्ये रॉक फॉस्फेटबरोबर स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंचा वापर केल्यास रॉक फॉस्फेटमधील अविद्राव्य 'ट्रायकॅल्शियम फॉस्फेट' पाण्यात विद्राव्य अशा 'मोनोकॅल्शियम फॉस्फेट' रुपांतर होते व या विद्राव्य स्फुरदाचे वनस्पतींच्या मुळावाटे सहजपणे शोषण केले जाते.
३. पालाश, गंधक व अन्य सुक्षम अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारी जैविक खते
पालाश, गंधक तसेच अन्य सुक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारी जैविक खते उपलब्ध झाली असून त्यांच्या वापरामुळे संबंधित अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिक उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे प्रयोगांती सिध्द झाले आहे.
४. सेंद्रिय पदा्थींचे विघटन करणारी जैविक खते
जमिनीत असो अथवा कंपोस्ट खड्यात असो, सेंद्रिय पदाथींचे विघटन करण्याचे म्हणजेच कुजविण्याचे काम ठराविक सुक्षम जीवाणूंकडूनच केले जाते. सेंद्रिय पदार्थ पुर्णपणे कुजविण्यासाठी लागणारा वेळ, सेंद्रिय पदाथींचा आकार, त्यातील पाण्याचे व कर्ब नत्राचे प्रमाण, कंपोस्ट खड्यात अगर जमिनीत अस्तित्वात असणा-या सेंद्रिय पदाथाचे विघटन करणा-या कार्यक्षम जीवाणूंचे प्रमाण यावर अवलंबून असते. सेंद्रिय पदाथीचा आकार जितका लहान तितकी कुजण्याची प्रक्रिया जलद होते. जीवाणूंच्या वाढीसाठी व कुजण्याची क्रिया कार्यक्षमतेने होण्यासाठी कुजविण्यात येणा-या सेंद्रिय पदार्थामध्ये ६० टक्के पाणी असणे गरजेचे असते. सेंद्रिय पदाथातील कर्बनत्राचे प्रमाण जितके कमी तितकी कुजण्याची प्रक्रिया जलद होते. ऊसाचे पाचट, गव्हाचे काड यासारख्या सेंद्रिय पदाथीमध्ये कर्ब नत्राचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी रासायनिक नत्र खताचा उपयोग करुन हे प्रमाण कमी करता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे सेंद्रिय पदाथाचे विघटन करणा-या कार्यक्षम जीवाणूंची संख्या ही संख्या जितकी जास्त तितका कुजण्याच्या प्रक्रियेला लागणारा वेळ कमी. सेंद्रिय पदाथाचे विघटन करणा-या जीवाणूंमध्ये ट्रायकोडमी, चिटोमिअम, पेनिसिलिअम व अस्परजिलस या बुरशीचा तसेच बॅसिलस, सेल्युलोमोनस, सायटोपगा या अणुजीवाणूंचा समावेश होतो.
वरील सर्व बाबी विचारात घेऊन व कार्यक्षम जीवाणूंचा वापर करुन कंपोस्ट खत केल्यास साडे तीन ते चार महिन्यात उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.
जैविक खताच्या वापरामुळे होणारे फायदे
१.बियाण्यांची उगवण लवकर व चांगली होते.
२.रोपांची जोमदार वाढ होते व पिके रोग व किडींनाचांगला प्रतिकार करतात.
३.वनस्पतींची उंची, फुटवे व पानांच्या संख्येमध्ये वाढ होते.
४.वनस्पतीतील नत्राचे प्रमाण वाढते.
५.द्विदल पिकांच्या मुळांवरील नत्र स्थिर करणा-या गाठींची संख्या वाढते व पिकाला नत्राचा चांगला पुरवठा होतो.
६.एकदल पिकाच्या बाबतीत धान्याचे वजन वाढते.
७.द्विदल पिकांच्या बाबतीत शेंगांचे व शेंगातील दाण्यांचे प्रामण वाढते. दाण्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते.
९.पीक उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
जैविक खते वापरण्याच्या पध्दती
१.जैविक खतांचे बियाण्यावर अंतरक्षीकरण
२.जैविक खतांचे रोपांच्या मुळांवर अंतरक्षीकरण
३.ऊसाच्या कांडयांवर जैविक खताचे अंतरक्षीकरण
४. जैविक खतांचा जमिनीतून व कंपोस्ट खतामधून वापर.
अशा या अल्प किंमतीत उपलब्ध असणाऱ्या बहुगुणी जैविक खतांचा शेतकरी बांधवांनी रासायनिक खताबरोबर पुरक खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खतांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होईल, पिकाचे उत्पादन वाढून पिकाची प्रतही सुधारेल, जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढेल.
शेतीविषयक माहितीसाठी वाट्सअप गृप : क्लिक करा
शेतीविषयक माहितीसाठी टेलिग्राम गृप : क्लिक करा
No comments
भेट दिल्या बद्दल धन्यवाद...!